(लोकमत ११/२/२०१४ ला प्रसिद्ध)
संदर्भ सोडून वाक्य उद्धृत करून सावरकरांची बदनामी करण्याची मोहीम सुरूच ठेऊन वारंवार असत्याचा पुनरूच्चार करून आपला सावरकर द्वेष मदन पाटील यानी त्यांच्या दि. ६ फेब्रुवारी च्या लेखात प्रगट केला आहे. माझ्या आधीच्या लेखात स्थलाअभावी मी काही ढोबळ उदाहरणे मांडली होती. परंतु आता मदन पाटील यांना त्यांच्या प्रत्येक मुद्दयावर उत्तर देणे, क्रमप्राप्त आहे.
संदर्भ सोडून वाक्य उद्धृत करून सावरकरांची बदनामी करण्याची मोहीम सुरूच ठेऊन वारंवार असत्याचा पुनरूच्चार करून आपला सावरकर द्वेष मदन पाटील यानी त्यांच्या दि. ६ फेब्रुवारी च्या लेखात प्रगट केला आहे. माझ्या आधीच्या लेखात स्थलाअभावी मी काही ढोबळ उदाहरणे मांडली होती. परंतु आता मदन पाटील यांना त्यांच्या प्रत्येक मुद्दयावर उत्तर देणे, क्रमप्राप्त आहे.
४ जुलै १९११, ३० ऑगस्ट १९११ आणि १३ नोव्हेंबर १९१३ या दिवशी केलेले अर्ज
हे दयेचे नव्हते, हे माझ्या लेखात स्पष्ट केले
आहे. परंतु मदन पाटील यांनी पुन्हा तेच आरोप केलेले आहेत.
"सावरकर ब्रिटिशांच्या तावडीतून मातृभूमी स्वतंत्र करू
पाहत होते की त्यांच्या शत्रूंशी लढून ब्रिटिशांचेच हात बळकट करू पहात होते?"
या प्रश्नावर मी एवढेच म्हणू इच्छितो की सावरकरांचे निवेदन उद्धृत करताना, "आम्ही हिंदुस्थानवर
स्वारी करण्याची खटपट करणा-या अफगाण, तुर्कादिक आशियातील विदेशी मुसलमानी टोळधाडीपासून स्वदेशाचे
संरक्षण करण्यासाठी, सैन्यात भरती होऊन
हिंदुस्थानच्या सीमासमरावर किंवा इतर तदनुषांगिक अशा कोणत्याही रणक्षेत्रात
जाण्यास कचरणार नाही.'' या वाक्याऐवजी "सर्व क्रांतिकारक आपला सशस्त्र
क्रांतिकारक आपला सशस्त्र लढ्याचा मार्ग सोडून इंग्रजी सैन्यात भरती होऊन लढण्यास
तयार आहेत.'' हे वाक्य खोडसाळपणे टाकले आहे.
प्रथम महायुद्धाचा इतिहास बघितला तर आढळून येईल की तुर्कस्थान जर्मनीस सामील होताच
संपूर्ण भारतात पॅन इस्लामीझमची लाट येऊन भारतापुढे एक नवे संकट उभे राहिले होते.
त्याचसोबत रशियातील मुसलमान टोळधाडीही भारतावर आक्रमण करण्यावर सज्ज झाल्या
होत्या. अशा परिस्थितीत वसाहतीचे स्वातंत्र्य, वरिष्ठ सभागृहात हिंदी
सदस्यांची बहुसंख्या आणि राजकीय कैद्यांची सुटका या अटींवर इंग्रजांना युद्धात
सहकार्य करण्याचा प्रस्ताव हा मुत्सद्दीपणाचा नव्हता का? पुन्हा सावरकरांनी स्वार्थी हेतूनेच अर्ज केले असा आरोप वारंवार
करताना "वाटले तर मला न सोडता इतर क्रांतिकारकांना सोडण्यात यावे" हे वाक्य मदन पाटील
सोयीस्कररित्या विसरतात.
स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या बंधूंनी त्यांच्या सुटकेसाठी
मोहीम चालवून सुमारे ८० सहस्त्र लोकांच्या सह्या घेतलेले निवेदन सरकारला पाठविले
यात चुकीचे ते काय? सुटकेचा प्रयत्न करणे हा कुठला
गुन्हा? आणि मुळातच स्वा. सावरकर आणि अन्य क्रांतिकारकांचा तुरुंगवास भोगल्याने
स्वातंत्र्य मिळेल असा अजिबात विश्वास नव्हता.
"स्वा. सावरकरांच्या दयेच्या अर्जातील भाषा, त्यांच्यातील धगधगत्या
क्रांतिकारकाला न शोभण्या सारखी होती आणि त्यात आर्जव, दिलगिरी होती" हे मदन
पाटलांचे विधान भारतीय अभिलेखाकारात उपलब्ध असलेल्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या
३० मार्च १९२० रोजी केलेल्या अर्ज बघता सरळसरळ खोटे ठरते. स्वातंत्र्यवीर
सावरकरांनी राजकारणात मर्यादित कालावधीकरिता भाग घेता येणार नाही आणि मर्यादित
काळाकरिता स्थानबद्धता स्वीकारावी लागेल, या अटी या अर्जात मान्य केलेल्या आहेत आणि ही गोष्ट त्यांनी
कुठेही लपवून ठेवली नाही. तुरूंगात राजकारण तर काय, इतर कुठल्याही प्रकारे समाजाची
सेवा करणे शक्य नव्हते. त्यामुळे राजकारणात भाग घेता न आला तरी अन्य अनेक मार्गाने
समाजसेवा करता येईल, या विचाराने स्वातंत्र्यवीर
सावरकरांनी अंदमानात असंख्य राजकैद्यांना या अटी मान्य करून आपली सुटका करून
घेण्याचा सल्ला दिला होता आणि स्वतःही या अटींवर सुटका करून घेतली. सावरकरांनी
रत्नागिरीत केलेले जातीभेद निर्मूलन, अंधश्रध्दा विरोध या क्षेत्रात केलेले महान कार्य बघून
रत्नागिरी येथील जाहीर सभेत कर्मवीर रामजी शिंदे यांनी "माझे उर्वरित आयुष्य
ईश्वराने सावरकरांना द्यावे'' असे उद्गार काढले होते.
श्री. मदन पाटील यांनी उद्धृत केलेला २७ डिसेंबर १९२३ चा
उतारा निखालस खोटा आहे. सावरकरांनी आपल्या अर्जांमध्ये असे स्पष्ट केलेले आहे की, "जेव्हा कोणत्याही शांत
अथवा वैध मार्गाने आमच्या राष्ट्राच्या आकांक्षा पूर्ण होण्याचा संभव उरलेला
आढळेना तेव्हा क्रांतिकारक मा्र्गाच्या आड आणि भीषण रानातून वाट काढीत जाणे
आम्हांस भाग पडले परंतु जर सध्या दिलेल्या सुधारणांच्या उपयोगातून पुढील
सुधारणांची प्राप्ती आणि तींतून त्या पुढील प्रगतीची शक्यता असा वैध विकास शक्य
होत असला तर अर्थातच आम्ही मोठ्या आनंदाने आमच्या क्रांतिकारक चळवळीही, ज्या तत्वावरच उभारलेल्या
होत्या, त्या प्रतियोगी तत्वप्रमाणेच
शांत आणि वैध मार्गावरच अवलंबून करू आणि सुधारणांचा प्रतियोगी पद्धतीने
राष्ट्रहितास पोषक असा शक्यतों उपयोग करून घेऊ''
स्वातंत्र्यवीर सावरकर ब्रिटिशधार्जिणे झाल्यामुळेच त्यांची
सुटका झाली, या आरोपाला पाच वर्षांची
राजकारण बंदी आणि स्थानबद्धता ब्रिटिशांनी १४ वर्षांपर्यंत वाढवली ही वस्तुस्थितीच
उत्तर देते.
छत्रपती संभाजी महाराज यांची हेतुपूर्वक बदनामी करण्याची
मोहीम या पूर्वी महाराष्ट्रात उघडण्यात आली होती आणि या बदनामीला उत्तर देण्यासाठी
सर्वप्रथम कै. डॉ. कमल गोखले यांना या विषयांत संशोधन करून त्यांचे तेजस्वी चरित्र
जगापुढे आणावे लागले. अशाच पद्धतीने सावरकरांचीही बदनामी करण्याची मोहीम केवळ
जातीवर मनुष्याचे गुणांकन करणाऱ्या काही जातीयवादी संघटना राबवत आहेत.
अंदमानाचा दहा वर्षांचा खडतर कारावास सोसल्यानंतर त्यांनी
लिहलेल्या कवितांवरून त्यांची जाज्वल्य राष्ट्रनिष्ठा आणि क्रांतिकारी बाणा
निर्विवाद सिद्ध होत असतानाही अर्थहीन संदर्भ, ओढूनताणून काढलेला अर्थ यांच्या
जोरावर त्यांची बदनामी करणारी प्रवृत्ती ही एक राष्ट्रघातक विकृतीच आहे आणि त्याला
वेळीच पायबंद घालणे आवश्यक आहे, अन्यथा उद्या हीच मंडळी, अशाच प्रकारच्या तर्कांवर आणि
पुराव्यांवर आधारित दांभिक युक्तिवादाने, छत्रपती शिवरायांचीही बदनामी करण्यास
कचरणार नाहीत.
No comments:
Post a Comment