(वार्ताहर, दि. २७/५/२०१५ ला प्रसिद्ध)
स्वातंत्र्यवीर सावरकर एक थोर क्रांतिकारक आणि देशभक्त तर होतेच पण त्याचबरोबर एक महान समाजसुधारक, साहित्यिक, महाकवी, विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिवादी होते. यातला एखादा देखील गुण अल्प-अंशाने असणाऱ्या व्यक्ती आज आपल्या देशाच्या इतिहासात अमर होऊन बसल्या आहेत. परंतु स्वा. सावरकर मात्र एकतर विस्मृतीच्या गर्तेत ढकलले जातात किंवा वादाच्या भोवऱ्यात.
स्वातंत्र्यवीर सावरकर एक थोर क्रांतिकारक आणि देशभक्त तर होतेच पण त्याचबरोबर एक महान समाजसुधारक, साहित्यिक, महाकवी, विज्ञाननिष्ठ आणि बुद्धिवादी होते. यातला एखादा देखील गुण अल्प-अंशाने असणाऱ्या व्यक्ती आज आपल्या देशाच्या इतिहासात अमर होऊन बसल्या आहेत. परंतु स्वा. सावरकर मात्र एकतर विस्मृतीच्या गर्तेत ढकलले जातात किंवा वादाच्या भोवऱ्यात.
याचे विश्लेषण करताना एकच गोष्ट पुढे येते आणि ती म्हणजे कॉंग्रेस सरकारने
सावरकरांची केलेली सतत अवहेलना आणि अन्याय. मुळातच सावरकरांच्या अवहेलनेची सुरवात
स्वातंत्र्यप्राप्तीच्या आधीच सुरु झाली होती. लाल किल्ल्यावर झालेल्या
स्वातंत्र्य सोहळ्याचे सावरकरांना साधे आमंत्रण पाठविण्याचे सौजन्यसुद्धा नेहरू
सरकारने दाखविले नव्हते. म्हणजे गांधीहत्ये प्रकरणात आरोपी होते म्हणून सावरकरांची
अवहेलना सुरु झाली नाही हे नक्की.
मग सावरकरांबद्दल नेहरू सरकारला आकस का वाटावा? नेहरूंना अशी भीती तर वाटत
नव्हती ना की भविष्यात सावरकर त्यांच्या सत्तेपुढे आव्हान उभे करतील? शक्यता आहे.
कारण मागे एकदा कॉंग्रेस अध्यक्षपदाची निवडणूक एकहाती जिंकत सुभाषबाबूंनी
गांधी-नेहरूंच्या अधिपत्याला आव्हान दिले होते तेव्हाही नेहरूंनी रडीचा डाव खेळत
सुभाषबाबूंना कॉंग्रेस सोडण्यास भाग पडले होतेच की.
मला वाटते कॉंग्रेसमध्ये प्रवेश करून गांधी-नेहरूंचे वर्चस्व मान्य करण्याचे
नाकारत जेव्हा सावरकरांनी हिंदुमहासभेत प्रवेश केला, तेव्हाच ते नेहरूंचे शत्रू
क्रमांक एक झाले होते. जर सावरकर राजकारणात गेलेच नसते तर त्यांना थोडाफार
मान-सन्मान नक्कीच मिळाला असता.
गांधीवध अभियोगातील काही तथ्ये आता पुढे येत आहेत. वल्लभभाई पटेल यांच्यासह
बहुतांशी मंत्र्यांचा विरोध असतानाही केवळ एका “ताकदवान नेत्याच्या दुराग्रहामुळे
सावरकरांना या खटल्यात, कणमात्रही पुरावा नसताना, कसे गोवण्यात आले होते” याबद्दलची माहिती डॉ.
बाबासाहेब आंबेडकरांनी स्वा. सावरकर यांचे विधिज्ञ श्री. भोपटकर यांना स्वत: भेटून दिली होती. तसेच
सावरकरांच्या विरोधात साक्ष देण्यासाठी आपल्यावर जबरदस्ती करण्यात आल्याची कबुली
माफीचा साक्षीदार दिगंबर बडगे याने मनोहर माळगावकर यांना दिल्याचे त्यांनी आपल्या
“Men who killed Gandhi” या पुस्तकात नमूद केले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर त्याकाळच्या परिस्थितीचे अवलोकन करणे महत्वाचे ठरेल.
स्वातंत्र्यानंतर सरकारपुढे निर्वासितांचा मोठा प्रश्न उभा ठाकला होता. त्या सोबतच
काश्मीरमधील पाकच्या आक्रमणामुळे जनतेमध्ये सरकार बद्दल असंतोष निर्माण झाला होता.
हिंदुमहासभेची वाढती लोकप्रियता आणि नेहरूंना कॉंग्रेस अंतर्गत होणारा वाढता विरोध
यामुळे नेहरू सरकार पुन्हा निवडून येईल का नाही अशी शंका निर्माण होऊ लागली होती.
आणि परिस्थिती अशी बिकट असतानाच कॉंग्रेसपुढे एक नवे संकट उभे ठाकले. त्यातच गांधीजींनी
कॉंग्रेस बरखास्त करण्याची कल्पना मांडली आणि सत्तेचे काय होणार या भीतीने
सत्ताधीशांच्या पोटात गोळा उठला.
परंतु .. नेमक्या याच वेळी झालेली गांधीहत्येमुळे कॉंग्रेस बरखास्तीची संकल्पना
बाजूलाच पडली आणि कुठलाही पुरावा नसताना सावरकरांना गांधीहत्येत गोवून कॉंग्रेसने
एका दगडात दोन पक्षी मारले. स्वातंत्र्यवीर सावरकरांचे राजकीय अस्तित्वच या
आरोपामुळे संपले आणि एकप्रकारे कॉंग्रेसने सावरकरांची राजकीय हत्याच केली. देशभर
३० हजारांहून अधिक हिंदुमहासभा सदस्यांना तुरुंगात डांबण्यात आले आणि दडपशाहीने हा
प्रमुख विरोधी पक्ष संपविण्यात आला. स्वतःला गांधीजींचा राजकीय वारस म्हणून
प्रस्थापित करत नेहरूंनी कॉंग्रेस पक्षात आपली एकाधिकारशाही निर्माण केली.
त्यानंतर पुढे त्यांनी आपल्यानंतर आपल्या मुलीला, म्हणजेच इंदिरा गांधींना,
कॉंग्रेसच्या अध्यक्षपदावर बसवून भारतातील आपल्या घराणेशाहीचा पाया घातला.
जर गांधीजी जिवंत राहिले असते तर काय झाले असते? कॉंग्रेस बरखास्त झाली असती
तर काय झाले असते? हे आणि असे अनेक अव्यक्त प्रश्न, पोलिसांना या कटाची पूर्ण
माहिती असतानाही गांधी हत्या का टळू शकली नाही याकडे संशयाचे बोट दाखविते. ‘द
लाइफ अँड डेथ ऑफ महात्मा गांधी’ या त्यांच्या चरित्र
ग्रंथात अमेरिकन लेखक रॉबर्ट पेन याने तर या हत्येचे वर्णन ‘अनुमतीने झालेली हत्या’
असे केले आहे.
दिनांक २०
जानेवारी १९४८ ला गांधीच्या प्रार्थनासभेत झालेल्या एका छोट्या स्फोटानंतर मदनलाल
पहावा या निर्वासित युवकास पकडण्यात आले. त्याने पोलिसांना नथुराम गोडसे आणि करकरे
यांच्या बद्दल माहिती दिली. परंतु या संबंधी चौकशीचा निव्वळ देखावा करत वेळकाढूपणा
करण्यात आला. दिल्ली, मुंबई, नगर आणि पुणे येथील पोलिसांना नथुराम आणि साथीदारांची
संपूर्ण माहिती असताना देखील त्यांना अटक तर तर सोडाच परंतु त्यांची साधी चौकशीही
केली नाही. नथुरामचे एक छायाचित्र जरी दिल्लीला पाठविले असते तरी गांधीजी वाचले
असते.
गांधीजींना वाचविण्यात सरकार आणि पोलीस यांनी
अक्षम्य हलगर्जी दाखविली हे एकवेळ मान्य केले तरी या प्रकरणात जे दोषी होते त्यांच्यावर
कारवाई का झाली नाही हा प्रश्न उरतोच. सगळ्यात धक्कादायक बाब म्हणजे गांधीना
वाचविण्यात हलगर्जीपणा करणारा प्रत्येक पोलीस अधिकारी हा बढत्या मिळत सन्मानाने
निवृत्त झाला. कटाची इत्थंभूत माहिती असणारे मोरारजी देसाई लवकरच महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री झाले आणि नंतर चक्क भारताचे पंतप्रधान. ज्यांनी गांधीहत्या होऊ दिली
ते सगळे सत्तेचे कुरण चरण्यास मोकाट सुटले आणि ज्यांनी स्वातंत्र्यासाठी आयुष्याचा
होम केला, अंदमानात अनंत यातना भोगल्या त्या सावरकरांच्या नशिबी आली आयुष्यभराची
बदनामी आणि स्वातंत्र्यानंतर पुन्हा भोगावा लागलेला कारावास.
सावरकरांच्या मृत्युनंतर मात्र काही दिवसतरी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे दिवस
बदलले असे वाटत होते. इंदिरा गांधीच्या काळात पोस्ट खात्याने सावरकरांवर काढलेल्या
तिकिटाच्या अनावरण समारंभात इंदिराजींनी त्यांच्यावर उत्तम भाषण केले. सावरकर
स्मारकाला त्यांनी आपल्या व्यक्तिगत खात्यातून दहा सहस्त्र देणगीही दिली. १९८९ मध्ये
तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनी सावरकरांवर त्यांच्या कार्याच्या सर्व
पैलूंचे विश्लेषण करणारे एक अत्यंत सुंदर भाषण केले होते. (आजही ते youtube वर
उपलब्ध आहे.) एकूणच आतातरी स्वातंत्र्यवीरांचा वनवास संपला असे वाटावे अशी
परिस्थिती निर्माण होत असतानाच सावरकरांच्या बदनामीची मोहीम पुन्हा सुरु झाली.
याचे कारण तरी काय की सावरकरांबद्दल चांगले बोलणारे अचानक वेगळी भाषा बोलू
लागले? केवळ सत्ता! कॉंग्रेसचा पराभव होऊन वाजपेयी सरकार आले आणि कॉंग्रेससह अन्य
विरोधीपक्षांनी सावरकरांचे छायाचित्र संसदेत लावण्यास विरोध केला. त्यानंतर
सावरकरांच्या बदनामीची मोहीम पद्धतशीरपणे सुरु झाली.
गांधीहत्या प्रकरणी निर्दोष सुटका झाली असताना देखील कपूर कमिशन अहवालातील एका
असंबद्ध वाक्याच्या संदर्भ देत “कपूर कमिशनने त्यांना दोषी ठरवले आहे आणि हा नवीन
पुरावा कोर्टाला उपलब्ध झाला असता तर सावरकरांना फाशीच झाली असती” असा खोटा प्रचार
सुरु झाला. वस्तुत: कपूर कमिशनने असा कुठलाही निष्कर्ष काढला नसून, अहवालाच्या
निष्कर्षात सावरकरांचा दुरान्वयेही संबंध कमिशनला जोडता आला नाही.
त्यानंतर दुसरा हल्ला सुरु झाला तो मुळी त्यांच्या क्रांतिकारक असण्यावरच.
सावरकर माफीवीर असून त्यांना आम्ही क्रांतिकारक मानणार नाही असा पवित्रा घेत पुन्हा
सावरकरांची बदनामी सुरु झाली. मणिशंकर अय्यरने तर सावरकरांची वचने अंदमान
कारागृहातील स्मारकावरून हटविली. पण सावरकरांनी मुळात माफी कधी मागितलीच नव्हती!
सुटकेसाठी पाच वर्षांसाठी राजकारण बंदी स्विकारणे ही माफी नव्हेच. पुन्हा या स्थानबद्धतेच्या
काळात सावरकरांनी रत्नागिरीत जातपात विरोधी अभूतपूर्व अभियान छेडले. पण आज त्याच
सावरकरांचा जातीय ठरवत, ते केवळ ब्राह्मण होते म्हणून द्वेष करणारी संघटना या
पुढारलेल्या महाराष्ट्रात जन्माला आली.
अर्थात आज केंद्रात आणि अनेक राज्यात भाजपा सरकार आले असतानाही सावरकरांवर
झालेला अन्याय दूर झालेला नाही. आज सावरकरांना मानणारे सरकार सत्तेवर असताना देखील
स्वातंत्र्यवीरांच्या ५० व्या आत्मार्पण स्मृतीवर्षात त्यांच्या नावाने एखादी
योजना निघू नये या सारखे दुर्दैव कोणते?
म्हणूनच आज गांधीहत्येत सावरकरांना का आणि कसे गोवण्यात आले याची चौकशी करून
त्यांच्या उज्ज्वल चारित्र्यावर लावण्यात आलेले खोटे डाग पुसणे हीच
स्वातंत्र्यवीरांना त्यांच्या आत्मार्पणाच्या पन्नासाव्या स्मृतीवर्षात खरी
आदरांजली ठरेल.
No comments:
Post a Comment