२४ जानेवारी २०१६ च्या ‘द विक’ या साप्ताहिकाच्या अंकात स्वातंत्र्यवीर सावरकर
यांची बदनामी करणारा लेख प्रसिद्ध झाला आहे. इतिहास संशोधनाच्या नावावर लेखकाने
वस्तुस्थितीचा विपर्यास करून एका महान क्रांतिकारकाचा अपमान केला आहे. या लेखातील
प्रत्येक मुद्दा याआधी अनेकदा खोडून काढला गेला असतानाही आज `द वीक' ने एक नवीन
संशोधन सादर करण्याच्या अविर्भावात नुराणी आणि शमसुल इस्लाम यांनी याआधीच केलेले
निराधार आरोप पुन्हा सादर केले आहेत.
१९०५ सालीच संपूर्ण स्वातंत्र्याची घोषणा स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी करून
ब्रिटिशांविरुद्ध बंड पुकारले होते. तत्कालिन राजकीय परिस्थितीत १९३० सालापर्यंत
काँग्रेसलाही अशी मागणी करण्याचे धैर्य झाले नव्हते. अशा असामान्य धैर्यशाली
व्यक्तीवर चिखलफेक करणा-या या लेखात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर मुख्यत: पाच
आरोप करण्यात आले आहेत.
आरोप क्र. १. - स्वातंत्र्यवीर सावरकर अंदमानमध्ये गेल्यानंतर खचले आणि
त्यांनी एका मागोमाग एक माफीपत्रं पाठविली, ज्यांचा उल्लेख माझी
जन्मठेप या चरित्रात नाही; त्यांना कोलू आदि कुठल्याही कठोर शिक्षा झाल्या
नव्हत्या.
वस्तुस्थिती – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपली सुटका व्हावी, यासाठी अनेकदा
आवेदनपत्रं पाठविली होती आणि ही वस्तुस्थिती त्यांनी आपल्या `माझी जन्मठेप' या आत्मचरित्रात
कधीही लपविली नाही. परंतु या आवेदनपत्रांत कुठेही आपल्या कृत्याबद्दल माफी आणि
पश्चाताप नाही. सावरकर बॅरिस्टर होते.
त्यामुळे वकिलीबाण्याने आपल्या सुटकेसाठी कायद्याच्या चौकटीत प्रयत्न करणे
त्यांच्या दृष्टीने गैर नव्हते. कुठल्याही प्रकारे ब्रिटिशांच्या तावडीतून सुटणे
आणि पुन्हा लढा उभारणे, हे प्रत्येक क्रांतिकारकाचे कर्तव्य आहे, हे सावरकरांचे मत
होते. हे आपले मत, अंदमानात असलेल्या क्रांतिकारकांपुढे ते वारंवार
मांडत. याला थोर क्रांतिकारक सच्चिंद्रनाथ संन्याल साक्षीदार होते. लाहोर कटाच्या
खटल्यात त्यांना जन्मठेपेची सजा झाली होती आणि सावरकरांप्रमाणेच वचनपत्र देऊन ते
सुटले. नंतर त्यांनी पुन्हा जोमाने क्रांतिकार्य सुरू केले आणि प्रसिद्ध काकोरी
कटाचे सूत्रधार म्हणून त्यांना पुन्हा जन्मठेपही झाली. आपल्या ‘बंदी जीवन’ या
आत्मचरित्राच्या पान २२६ वर ते म्हणतात, ``सावरकरांनी केलेल्या
अर्जात माझ्याप्रमाणेच सहकार्याचे वचन दिले होते, परंतु माझी सुटका झाली पण
त्यांची का नाही?... ... ... कारण सरकारला अशी भीती होती की, सावरकरांची सुटका
झाली तर महाराष्ट्रात पुन्हा बंडाचा भडका उडेल.''
`द वीक' ने नोव्हेंबर
१९१३ मधला एक अर्ज दिला आहे. परंतु त्यात कुठेही पश्चाताप किंवा माफी नाही. या
अर्जात आम्हाला एकतर राजकीय बंदी हा दर्जा द्या, नाहीतर सामान्य
बंदिवानांप्रमाणे सवलती द्या आणि हे शक्य नसेल तर भारतात अथवा ब्रह्मदेशातील
तुरुंगात पाठवा ही मुख्य मागणी आहे.
या अर्जाच्या शेवटी “Where else the prodigal son can go..” हे वाक्य असले
तरी ती व्यंगोक्ती आहे. याच अर्जातील “विशेष गैरसोई भोगण्यासाठीच आम्हाला विशेष
कैदी म्हणून गणले जाते”, “युरोपमधील इतर सुधारलेल्या देशात अशी मागणी
करावी लागली नसती”, “”प्रत्येक मनुष्याचा जो मुलभूत अधिकार आहे, अशा गोष्टींची
मागणी करावी लागणे हेच दुर्दैवी आहे” इत्यादी वाक्यातून ब्रिटीशांना लगावलेले टोले
बघता हि गोष्ट स्पष्ट होते.
स्वातंत्र्यवीर सावरकर तुरुंगात खचले होते की नाही आणि सावरकरांनी सुटकेच्या
अर्जात लिहिलेला मजकूर हा त्यांच्या व्यूहरचनेचा भाग होता की नाही, हे बघायचे असेल
तर त्यासाठी जेलमध्ये त्यांच्याबरोबर शिक्षा भोगत असलेले क्रांतिकारक आणि
तुरुंगाच्या नोंदी तपासणे, हाच एकमेव मार्ग आहे. परंतु श्री. टकले यांनी
असे काहीही केलेले नाही. सावरकरांबरोबर तुरुंगात असलेले क्रांतिकारक उल्लासकर दत्त, भाई परमानंद, रामचरण शर्मा, पृथ्वीसिंह आझाद
आणि सच्चिंद्रनाथ संन्याल या प्रसिद्ध क्रांतिकारकांनी आपल्या आत्मचरित्रात केलेले
सावरकरांचे उल्लेख वस्तुस्थिती स्पष्ट करतात.
उल्लासकर दत्त यांना प्रचंड छळामुळे वेडाचा झटका आला होता. त्या आधी त्यांना
जेव्हा हातकडीत टांगून ठेवले होते. तेव्हा तापाच्या भरात त्यांना भास झाला. त्यात
जेलर बारी ने त्यांना द्ंवद्व युद्धाचे आव्हान दिल्यानंतर सावरकर त्यांच्या वतीने
लढतात व बारीचा पराभव करतात. (१२ years in prison life – page ६४ & ६५) आता अगदी
भ्रमात असतानादेखील सावरकरच आपल्यासाठी लढण्यास योग्य आहेत, हा उल्लासकर दत्त
यांचा विश्वास हा सावरकरांचे मनोबल १९१२ मध्ये कसे होते, हे सिद्ध करतो.
१९१३ मध्ये सुराज्य पत्राचे संपादक रामशरण शर्मा यांना संपात भाग घेतल्याबद्दल
जेव्हा सजा वाढविण्याची धमकी जेलरने दिली तेव्हा त्यांनी उत्तर दिले ``यदि विनायक
सावरकर ५० वर्ष काट सकते हैं, तो मैं भी काट
लूंगा।'' (काला पानी का ऐतिहासिक दस्तऐवज पृष्ठ ५३) म्हणजेच १९१३
मध्ये देखील क्रांतिकारक सावरकरांकडे एक आदर्श म्हणूनच बघत होते. जर सावरकरांचे
मनोबल तुटले असते तर असे शक्य होते का?
१९१९ मधल्या संपाबद्दल अंदमानमध्ये सजा भोगत असलेले महान क्रांतिकारक भाई
परमानंद आपल्या ‘आपबीती’ या चरित्रात म्हणतात की, जेलमध्ये झालेल्या
कुठल्याही संघर्षासाठी जेलर बारी आणि पर्यवेक्षक, सावरकर बंधूंनाच जबाबदार
धरत असत. (आपबीती – पृष्ठ १०२)
१४ नोव्हेंबर १९१३ चा अर्ज देताना सावरकरांनी सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांच्याशी
व्यक्तीगत चर्चा केली होती. हा अर्ज सरकारकडे पाठविताना आपल्या २३ नोव्हेंबर १९१३
च्या अहवालात सर रेजिनॉल्ड क्रेडॉक यांनी सावरकरांबद्दल काढलेले निष्कर्ष अत्यंत
महत्वाचे आहेत. ते म्हणतात
“सावरकरांचा अर्ज
हा दयेचा असला तरी त्यात त्यांनी कुठेही खेद अथवा खंत व्यक्त केलेली नाही. पण
त्यांनी आपला दृष्टीकोन बदलला असल्याचा दावा केला आहे. १९०६-०७ मध्ये असलेल्या
परिस्थितीमुळे आपण कट रचला असे त्यांचे म्हणणे आहे. पण आता सरकारने विधिमंडळ, शिक्षण इत्यादी
अनेक बाबीत सुधारणा करण्याचा सलोख्याचा दृष्टीकोन अवलंबला असल्याने क्रांतिकारी मार्ग अनुसरण्याची गरज
नाही असे त्यांचे म्हणणे आहे.”
“सावरकरांच्या
बाबतीत त्यांना इथे कुठलीही मोकळीक देणे शक्य नाही आणि माझ्या मते ते कुठल्याही
भारतीय तुरुंगातून पळून जातील. ते इतके महत्वाचे नेते आहेत की युरोपातील भारतीय
अराजकतावादी त्यांना सोडविण्यासाठी कट रचून तो अल्पकाळात अमलातही आणतील. त्यांना
जर सेल्युलर जेल बाहेर अंदमानात धाडले तर त्यांची सुटका निश्चित आहे. त्यांचे
मित्र सहजतेने एखादे भाड्याचे जहाज जवळपास लपवू शकतील आणि थोडे पैसे पेरून
त्यांच्या सुटकेसाठी उर्वरित बाबी सहज शक्य करतील. (रेजिनॉल्ड क्रेडॉक यांचा
हा अंदाज लवकरच खरा ठरला. १९१४ मध्ये जर्मनीने आपली युद्धनौका एम्डेम स्वा. सावरकर
आणि इतर क्रांतीकारकांना मुक्त करून सिंगापूरला नेण्यासाठी पाठवली होती. सिंगापूर
येथील नियोजित सैनिकी उठावाचे नेतृत्व त्यांनी करावे अशी योजना होती. पण
दुर्दैवाने एम्डेम बुडविण्यात ब्रिटीशांना यश आले. सिंगापूरला सैनिकी उठाव झाला पण
योग्य नेतृत्व नसल्याने त्याचा लवकरच बिमोड झाला.)
“सावरकरांसारख्या माणसालाही अगणित काळ कठोर
परिश्रमाचे काम देता येणार नाही. त्यांच्या लागोपाठ भोगावयाच्या शिक्षेचा पन्नास
वर्षांचा कालावधी त्यांना आयुष्यभर तुरुंगात ठेवण्यासाठी पुरेसा आहे. काही वर्षाचे
कठोर परिश्रम त्यांच्या अपराधासाठी दंड म्हणून पुरेसा होईल आणि ते समाजाला
धोकादायक असल्याने उर्वरित काळात त्यांना तुरुंगातच बंदिवास भोगावा लागेल.”
परंतु रेजीनॉल्ड क्रेडॉक यांच्या या सविस्तर निष्कर्षांकडे आणि सावरकरांबरोबर
अंदमानात शिक्षा भोगत असलेल्या सचिंद्रनाथ सान्याल,उल्लासकर दत्त, रामशरण शर्मा आणि
भाई परमानंद यांच्या प्रत्यक्ष अनुभवांकडे मात्र निरंजन टकले यांनी सोयीस्कररित्या
दुर्लक्ष केले आहे. त्यांचे हे कृत्य, त्यांचा लेख हा संशोधन नसून सावरकरांचे
चारित्र्यहनन करण्याचा डाव असल्याचे सिद्ध करतो.
सावरकरांनी जेलमध्ये कुठलेही कष्ट भोगले नाहीत, असा एक बिनबुडाचा आरोप
श्री. टकले यांनी केला आहे. परंतु अंदमानमध्ये १९१६ ते १९२१ मध्ये सजा भोगत असलेले
महान क्रांतिकारक पृथ्वीसिंह आझाद यांचा अनुभव काही वेगळेच सांगतो.
``वीर सावरकर ने
आधुनिक भारत के युवकों को क्रांती का पाठ पढाया था। क्रांतिकारी वृत्तीवाले
नवयुवकों के वे तेजस्वी नेता थे। ऐसे सामर्थ्यशाली व्यक्ति से, अंग्रेज
अधिकारियों ने वह काम लिया जो बैलोंसे लिया जाता था। तेल के कोल्हू पर प्रतिदिन
तीस पौंड तेल निकालने के लिए सावरकर को मजबूर किया गया।'' (क्रांति के पथिक
- पृष्ठ १०८)
सावरकरांच्या history sheet वर तसा उल्लेख नसल्यामुळे स्वातंत्र्यवीर
सावरकर यांनी कधी कोलू ओढलाच नाही आणि त्यांना केवळ दोर वळणे इत्यादी सोपी कामे
दिली जात असे टकले यांचे म्हणणे आहे. परंतु कोलू किंवा काथ्या कुटणे ही रोजची कामे
आहेत आणि history sheet वर केवळ कैद्याला
झालेल्या शिक्षा आणि अन्य वैयक्तिक माहिती असल्याने कोलू ओढल्याची नोंद सावरकरच
नव्हे तर कुठल्याच कैद्याच्या history sheet मध्ये नसते. १९१३ च्या अर्जातच सावरकर आपल्याला
कोलू ओढावा लागतो असे म्हणतात. आणि सर रेजिनॉल्ड क्रेडॉकही सावरकरांना अजूनही काही
काळ अशा कठोर परिश्रमाला समोर जावेच लागेल असे म्हणतात. हे दस्तावेज आणि
पृथ्वीसिंह आझाद यांच्या सारख्या सह-बंदीवानांच्या आठवणी, टकले यांचे
सावरकरांनी कोलू ओढलाच नाही, त्यांना साधी सोपी कामे दिली जात असे तथाकथित
संशोधना अंती काढलेले निष्कर्ष खोटे आहेत हेच सिद्ध करतात.
सद्ध्या उपलब्ध असलेल्या कारागृहातील नोंदींप्रमाणे त्यांनी भोगलेल्या अमानवीय
शिक्षा खालील प्रमाणे
• ३० ऑगस्ट १९११ या दिवशी त्यांना सहा महिने
एकांत-कोठडीची शिक्षा.
• ११ जून १९१२ या दिवशी त्यांच्याजवळ कागद
सापडल्याबद्दल १ महिना एकांत-कोठडीची शिक्षा.
• १० सप्टेंबर १९१२ या दिवशी त्यांच्याजवळ
दुस-याला लिहिलेले पत्र सापडल्याबद्दल सात दिवसांची खडी हातबेडी.
• २३ नोव्हेंबर १९१२ या दिवशी त्यांच्याजवळ
दुस-याला लिहिलेले पत्र सापडल्याबद्दल एक महिन्याची एकांत-कोठडीची शिक्षा.
• ३० डिसेंबर १९१२ ते २ जानेवारी १९१३ मध्ये अन्नत्याग.
• १६ डिसेम्बर १९१३ काम करण्यास नकार.
• १७ डिसेंबर १९१३ एक महिना एकांत-कोठडीची
शिक्षा. पुस्तके अथवा काम नाही.
• ८ जून १९१४ काम करण्यास नकार. सात दिवसाची
खडी-हातबेडी..
• १६ जून १९१४ काम करण्यास नकार. चार महिने
साखळदंड.
• १८ जून १९१४ काम करण्यास नकार. दहा दिवस
खोडाबेडीची शिक्षा
• १९ जून १९१४ दोर वळण्याचे काम करण्याची तयारी
दाखवली
• १६ जुलै १९१४ एका महिना दंडाबेडीची शिक्षा
• १८ मे १९१५ दंडाबेडीची शिक्षा
• ११ जून १९१५ रुग्णालयात भरती केल्यामुळे
दंडाबेडी काढली.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना देण्यात आलेल्या अनेक शिक्षा या बेकायदेशीर
असल्याने त्याची नोंद झाली नाही, असे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘माझी
जन्मठेप’ या पुस्तकात स्पष्टपणे म्हटले आहे आणि इतर क्रांतिकारकांच्या
आत्मचरित्रातही हे स्पष्ट केले गेले आहे. तरीही वरील अपूर्ण दस्तऐवज बघतानाही
सावरकरांना किती कठोर शिक्षा झाल्या होत्या. याची झलक मिळते. सावरकरांना अंदमान
मध्ये पोहोचल्यावर लगेचच ६ महिने एकांतवासात ठेवले होते. ही किती भयानक शिक्षा आहे
हे कुठलाही मानसोपचार तज्ञ सांगेल. परंतु टकले, शमसुल इस्लामच्या हवाल्याने याला
केवळ एक किरकोळ शिक्षा समजतात. “ही शिक्षा आजपावेतो केवळ मलाच देण्यात आली”, असे सावरकर
आपल्या १९१३ च्या अर्जात म्हणतात.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांची तुरुंगातील वागणूक उत्तम असल्याचा उल्लेख जेल
रेकॉर्डमध्ये असल्याचे सांगत श्री. टकले, सावरकर ब्रिटिशांशी सहकार्य करत होते असा आरोप
करतात. पण त्याच अहवालातील``मनोवृत्ती'' या स्तंभाखाली लिहिलेला, “त्यांची वागणूक
सभ्य असली तरीही त्यांनी सरकारला सक्रीय सहकार्य करण्याची प्रवृत्ती कुठेही
दाखविली नाही. त्यांचे खरे राजकीय विचार काय आहेत, हे यावेळी सांगता येणे
कठीण आहे'', हा शेरा सावरकर ब्रिटिशांना सहकार्य करत नव्हते हे स्पष्ट
करतो. सावरकर हे अजूनही धोकादायक कैदी आहेत, असे सरकारचे १९१९ मध्ये स्पष्ट मत होते आणि याच
अहवालाच्या आधारावर सावरकरांना सार्वत्रिक माफीचा लाभ देऊ नये, असा निर्णय मुंबई
प्रांतिक सरकारने घेतला होता.
रेजिनॉल्ड क्रेडॉक यांच्यापुढे आवेदनपत्र सादर केल्यावर स्वातंत्र्यवीर सावरकर
हे लगेच पुढील महिन्यात संप पुकारतात आणि त्याबद्दल त्यांना एक महिन्याची
एकांतवासाची शिक्षा होते आणि त्यानंतरही अनेकदा ते काम नाकारून खडाबेडी, दंडाबेडी, एकांतवासाची
शिक्षा भोगतात, हे त्यांच्या कणखर स्वभावाचे निर्विवाद निदर्शक आहे.
पृथ्वीसिंह आझाद, उल्लासकर दत्त, भाई परमानंद, रामचरण शर्मा आणि
सच्चिंद्रनाथ संन्याल यांच्यासारखे महान क्रांतिकारकांचे अनुभव सावरकरांचे मनोबल
शेवटपर्यंत कणखर होते हे सिद्ध करतात. सर रेजिनॉल्ड क्रेडॉक सावरकर अत्यंत
धोकादायक आहेत असे स्पष्टपणे नमूद करतात.
यानंतरही सावरकरांच्या मनोधैर्याबद्दल कुणाच्या मनात काही शंका असल्यास त्याचे
निराकरण करणारा अस्सल पुरावा स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला मिळाला
आहे. अंदमानात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेले हस्तलिखित प्रकाशात आले असून
त्यात स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी उर्दूत लिहिलेल्या तीन देशभक्तीपर रचना आहेत.
१९२१ मधल्या या हस्तलिखितातील रचना, युवकांना ब्रिटिशांविरुध्द उठाव करण्याचे आवाहन
करतात. यातील एक गीत सच्चिंद्रनाथ संन्याल यांच्याद्वारे काकोरी कटातील
आरोपींपर्यंत पोहोचले असावे. तुरुंगात जी देशभक्तीपर गीते हे क्रांतिकारक गात, त्यात सावरकरांची
“यही पाओगे...'' ही गझल समाविष्ट होती. (काकोरी के दिलजले, पृष्ठ ११२).
सावरकरांनी उर्दूत लिहिलेल्या “हम ही हमारे वाली या कवितेत ते म्हणतात,
“हंता रावणका हैं
अपना राम वीरवर सेनानी,
कर्मयोग का देव हैं स्वयं कृष्ण सारथी अभिमानी।
भारत तेरे रथ को सेना कौन रोकने वाली हैं,
फिर देर क्यूं, उठो भाई हम ही हमारे वाली हैं।।''
१९१० मध्ये अंदमानमध्ये जाण्याआधी लिहिलेल्या “पहिला हप्ता'' या कवितेत हेच
भाव व्यक्त झाले होते आणि १० वर्षांच्या कठोर कारावासानंतरही सावरकरांचे विचार
तीळमात्र बदलले नव्हते, हेच सावरकरांचे हस्तलिखित निर्विवाद सिद्ध
करते. मनोबल खचलेली व्यक्ती अशी कविता कधीच लिहू शकणार नाही.
स्वा. सावरकरांची सुटकेबद्दल स्पष्ट भूमिका
आपली सुटकेचा अर्ज करण्यामागची भूमिका स्वा. सावरकरांनी स्वत: आपल्या भावाला
पाठविलेल्या पत्रात स्पष्ट केली आहे. हे पत्र तुरुंगाधिकारी तपासून मगच पाठवत
असल्याने सावरकरांची भूमिका सरकारला माहित होती. त्याच प्रमाणे या पत्रातील मजकूर
लगेचच वर्तमान पत्रात छापून आला आणि त्याची नोंदही पोलिसांनी घेतली. हे पूर्ण
पत्रच खाली देत आहे.
पोर्ट ब्लेअर,
दिनांक ६-७-१९२०
प्रियतम बाळ,
तुझे दि. २-६-१९२० चे ती. बाबांना लिहिलेले पत्र पोचले. तुझ्या येथे येण्याची
एकसारखी पुढे चालढकल चालली होती; त्यामुळे आम्हाला मोठी काळजी लागली होती.
तुझ्या पत्राने ती दूर होऊन मन शांत झाले. माझी प्रकृती तू येथून गेलास त्या वेळी
जशी होती तशीच आहे. त्याहून वाईटही झालेली नाही. मात्र तू गेल्यापासून ती. बाबांची
प्रकृती एकसारखी खालावत चालली आहे. आता त्यांची पाळी आलेली दिसते. दुखणे तेच आहे.
पहिल्याने अपचनाचा विकार आणि मग त्यापासून होणारा यकृताचा बिघाड. त्यांचे वजन १०६
रत्तल आहे! मी होऊन इतके लिहितो आहे तेव्हा आमची प्रकृती प्रत्यक्ष यापेक्षा
विशेषच वाईट असेल असे समजू नकोस. तसे मुळीच नाही. अगदी जशी स्थिती आहे तसे मी
वर्णन केले आहे. काही उणे अधिक झालेच तर मी तुला लागलीच कळवीन.
अखेर राजक्षमेची आज्ञा आली. शेकडो बंदी कारागृहातून मुक्त होत आहेत. मुख्यतः
ज्यांनी राजकीय बंद्यांच्या मुक्ततेसाठी असंख्य स्वाक्षरींच्या अर्जाची योजना केली, त्याला पाठिंबा
दिला, त्याच्यावर संमत्या घातल्या त्या आपल्या पुढार्यांच्या आणि देशबांधवांच्या, त्यातही मुख्यतः
बाँबे नॅशनल युनियनच्या अनवरत परिश्रमांचे हे फळ आहे. इतक्या थोड्या अवकाशात
चांगल्या पाऊण लाख लोकांच्या नावाने पाठवलेल्या प्रचंड अर्जाचा सरकारच्या मनावर
विलक्षण परिणाम झाला असलाच पाहिजे मग ते कितीही नाकारीनात. निदान त्या अर्जाने
राजकीय बंद्यांची आणि त्यामुळे ज्या कार्यासाठी ते लढले व हरले त्या कार्याची
नैतिक प्रतिष्ठा वाढवली यात शंका नाही. आता खरोखर आमची सुटका व्हावयाचीच असेल तर
तिच्यात काही तरी अर्थ वाटेल. कारण आम्ही त्यांच्यात परत यावे अशी इच्छा आमच्या
देशबांधवांनी प्रदर्शित केली आहे. त्यांनी आमच्यासाठी जी काळजी आणि सहानुभूती
दाखविली त्यासाठी त्यांचे किती आभार मानले तरी थोडे आहेत. त्यांच्या जितक्या
आत्मीयतेला आम्ही पात्र आहो असे आम्हाला प्रामाणिकपणाने वाटते त्यापेक्षा त्यांनी
आमच्याविषयी अधिक आत्मीयता आणि आदर दाखविला आहे. आणि त्यांचे प्रयत्न अगदीच व्यर्थ
गेले नाहीत. कारण जरी आम्ही दोघे या क्षमादानाच्या कक्षेच्या बाहेर पडतो असे
सांगण्यात आले आहे आणि त्यामुळे आम्हांला या कोठडीत खितपत पडावे लागते आहे, तरी आपल्या
सांगाती कष्ट सोशीत असलेल्या आणि राजकारणात आपल्याशी सहकार्य केलेल्या शेकडो
देशभक्तांच्या मुक्ततेच्या दिसणार्या दृश्याने आमचे कष्ट हलके झालेले आम्हांला
वाटतात; आणि त्यामुळे गेली आठ वर्षे इथे आणि इतरत्र संप, पत्रे, अर्ज यांच्या
द्वारे वर्तमानपत्रातून किंवा व्यासपीठावरून जी चळवळ आम्ही केली तिचे आम्हांला फळ
मिळाल्याचे समाधान वाटते.
दि. २-४-१९२० ला मी राज्यकर्त्यांनी नुकत्याच दिलेल्या या क्षमादानाच्या
प्रश्नासंबंधी नवीन अर्ज सरकारकडे पाठविला आहे. त्या अर्जात सरकारने हे जे शेकडो
राजकीय बंदी सोडले आणि अशा रीतीने माझा १९१८ चा अर्ज अंशतः मान्य केला त्यासाठी
पहिल्याने आभार मानले आहेत आणि मग अद्यापही बंधनात असलेल्या आणि त्याप्रमाणेच
राजकीय कारणासाठी परदेशात अडकून पडलेल्या अशा सर्वांना लाभ मिळेल अशा रीतीने या
क्षमादानाची मर्यादा वाढवली पाहिजे अशी विनंती केली आहे. तसेच हिंदुस्थानातील
एकंदर राजकीय परिस्थितीसंबंधी आणि त्यातही विशेषतः अधिकारीवर्गात ज्या
प्रश्नांविषयी वेळोवेळी आणि अद्यापही चर्चा आणि वाद होतो आणि जे अगदी अलीकडे त्यांच्यापैकी
काहीनी स्वतः माझ्यापुढे मांडले आहेत अशा प्रश्नांच्या संबंधात व्यक्तिशः माझे
धोरण काय आहे हेही मी पुनः एकदा विशद केले आहे.
ज्यात सर्व मनुष्यजातीचा समावेश होईल आणि जेथील एकूण एक स्त्री-पुरूषांना, ही पृथ्वी, हा सूर्य, ही भूमी आणि हा
प्रकाश - हीच मनुष्याची खरी पितृभूमी आणि मातृभूमी आहेत - यांच्यापासून मिळणार्या
लाभासाठी प्रयत्न करण्याचा आणि त्यांचा उपभोग घेण्याचा समान अधिकार राहील असे
संपूर्ण जगाचे एकराष्ट्र हे आमचे ध्येय आहे आणि त्यावर आमचा विश्वास आहे. इतर सारे
विभाग आणि भेद अवश्य असले तरी कृत्रिम आहेत. ज्याप्रमाणे पेशीचे रूपांतर
व्यक्तिपिंडात होते, व्यक्ती कुटुंबात आणि संघात विलीन होतात, संघाची राष्ट्रे
बनतात, त्याप्रमाणे सर्व राष्ट्रे ज्याच्यात एकरूप होऊन जातील असे विश्वराष्ट्र
प्रस्थापित करणे हेच सर्व राजकीय शास्त्र आणि कला यांचे ध्येय आहे किंवा असावयाला
पाहिजे हे तत्त्व आम्हाला मान्य आहे. तेव्हा साहजिकच विश्वकुटुंबित्व ही
देशाभिमानाची वरची पायरी ठरते. आणि म्हणून एखाद्या साम्राज्याला किंवा समान
अधिकारी घटकांच्या संयुक्त राष्ट्रसंघाला, परस्परांविरुद्ध वंशसमूहांना आणि
राष्ट्रसमूहांना एकत्र आणून एकजीव नाही तरी ज्यामुळे त्यांपैकी प्रत्येकाला
आपआपल्या जीवनाची त्याच्या सर्व उदात्त स्वरूपात ओळख पटून ते संपन्न बनवून उपभोग
घेण्याची अधिक पात्रता येईल अशा रीतीने समरूप बनवता आले तर ते एक ध्येय
गाठण्याच्या मार्गावरील पुढे टाकलेले पाऊल आहे. या विचारसरणीवर माझा विश्वास
असल्यामुळे जो ब्रिटिशही होणार नाही व जो हिंदीही असणार नाही, तर अधिक चांगले
नाव सापडेपर्यंत ज्याला आर्य म्हणता येईल असा एखादा संयुक्त राष्ट्रसंघ
स्थापावयाचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात आला तर त्यात मला सदसद्विवेकबुद्धीला
स्मरून सहकार्य करता येईल. हेच ध्येय डोळ्यांपुढे ठेवून मी गत कालात झगडलो आहे.
हेच ध्येय दृष्टीसमोर ठेवून मी आताही कार्य करावयाला सिद्ध आहे. म्हणून सरकारने
आपला दृष्टिकोण पालटला आहे आणि भरतवर्षाला स्वातंत्र्य, सामर्थ्य अणि
पूर्ण चैतन्य यांच्या मार्गाने सशस्त्र प्रतिकार न करता पुढे जाणे शक्य करण्याची
त्याची इच्छा आहे असे ऐकून मला आनंद वाटला. माझा विश्वास आहे की, खरोखर अशी
परिस्थिती असल्यास माझ्याप्रमाणेच इतरही पुष्कळ क्रांतिकारक आपले पाऊल जेथल्या
तेथे थांबवतील, या मिळालेल्या सुधारणानंतरच्या विधिमंडळाच्या मोडक्यातोडक्या वाटेवरच्या
धर्मशाळेत मानप्रद अशा संधीसाठी इंग्लंडशी हात मिळवावयास सिद्ध होतील आणि पुनः
प्रगतीच्या रस्त्यावर पुढे पाऊल टाकावयाची आज्ञा उच्चारली जाईपर्यंत तेथे कामही
करतील.
मानव्य (विश्वकुटुंबिता) ही देशाभिमानाच्या वरची कोटी आहे हे तत्त्व आम्हाला
संमत असल्यामुळेच एकच अवयव इतरांच्या जिवावर इतका पुष्ट होऊ लागला आणि एखाद्या
असाध्य काळपुळीप्रमाणे फुगून सर्व मनुष्यजातीचे जीवन संकटात आल्यासारखे वाटू लागले
त्या वेळी आम्हाला स्वस्थ बसवेनासे झाले. दुसरा परिणामकर असा कोणताही उपाय दिसत
नसल्यामुळे शल्यचिकित्सकाची सुरी आपल्या हातात धरावी लागली आणि निरंतरचे दयाममत्व
साधण्यासाठी क्षणभराचा निष्ठुरपणा पत्करणे अवश्य आहे असे वाटू लागले. पण याप्रमाणे
दंडाची प्रतिक्रिया दंडानेच करावयाला आम्ही सिद्ध झालो तरी तेव्हाही आम्हाला
मनापासून कोणत्याही स्वरूपातल्या अत्याचाराचा तिटकारा असे, आताही आहे. कारण
परक्याचे जीवित हिरावून घेण्यासाठी आक्रमकतेने केलेला बलप्रयोग म्हणजेच अत्याचार.
व्यक्तिशः किंवा राष्ट्र या नात्याने दुसर्याचा अपहार करण्याची महत्त्वाकांक्षा
स्वप्नातदेखील मला शिवली नाही आणि अत्याचाराच्या कल्पनेपासूनदेखील मी इतका दूर असे
की जेव्हा समर्थ संघांनी आपल्या दुबळ्या पण सत्पक्षाच्या शेजार्याविरुद्ध त्याचा
उपयोग केलेला मला जेथे जेथे आणि जेव्हा जेव्हा दिसला तेथे तेथे आणि तेव्हा तेव्हा
त्याचा मी प्राणपणाने विरोध केला; गत कालात महत्त्वाकांक्षी व्यक्तींनी -
हिंदुस्थानच्या बाहेरच्याच नाही तर भारतवर्षातसुद्धा अवलंबिलेल्या सर्वच
अत्याचारांचा मी मनापासून तिटकारा करीत आलो आहे. या भरतभूमीवर परक्यांनी अधिकार
गाजवावा या गोष्टीच्या विरुद्ध माझे मन जितके बंड करून उठे तितकेच ते येथल्या
जातिभेद आणि अस्पृश्यता या गोष्टींविरुद्ध उठे.
तेव्हा आम्ही जे क्रांतिकारक झालो ते निरुपाय म्हणून झालो, उल्हासाने नाही.
हिंदुस्थानच्या आत्यंतिक हिताच्या दृष्टीने आणि इंग्लंडच्याही हिताच्या दृष्टीने
त्यांनी परस्परांच्या साहाय्याने आणि सहकार्याने आपली ध्येये शांततेने आणि क्रमशः
प्रगती होऊन गाठणे अवश्य आहे असे आम्हाला तेव्हा वाटे, आणि अद्यापिही जर
ते अवश्य असेल तर शांततेच्या उपायाचा अवलंब करण्यासाठी आलेली पहिली संधी मी साधीन
आणि प्रत्यक्ष क्रांतीने किंवा अन्य मार्गाने पाडलेल्या घटनानुसारी प्रगतीच्या
भगदाडात घुसेन आणि उत्क्रांतीच्या सेनेला त्यातून एकसारखे, अडथळा न होता, जाता येईल अशा
रीतीने ते भगदाड रुंद करण्याचा प्रयत्न करीन.
सरकारने जर राज्यघटनेत मनःपूर्वक सुधारणा केल्या नि त्या उपयोगात आणल्या आणि
त्या सुधारणांमुळे ही असली घटनेची खिंड निर्माण झाली तर मग राज्यक्रांती तेथेच
संपेल आणि तिच्या जागी उत्क्रांती हा आम्हांला सर्वांना एकत्र आणणारा शब्द होऊन
बसेल. अणि मातृभूमीच्या सेनेतील एक क्षुद्र सैनिक म्हणून मी त्या सुधारणा यशस्वी
करण्यासाठी मनःपूर्वक झटेन; म्हणजे त्या सुधारणांचा उपयोग भारताला पुनः
स्वतंत्र वैभवशाली आणि थोर बनवून, इतर राष्ट्रांच्या हातात हात घालून किंवा
त्यांना मार्ग दाखवून मनुष्यजातीच्या नियत भवितव्याकडे घेऊन जाण्यासाठी करीन.
राज्यक्रांतिकारकांच्या संघात ज्या
वेळी मी काम करीत होतो त्या वेळी माझे विचार असे होते आणि आज एकांत कोठडीच्या चार
भिंतींच्या आत कोंडले गेल्यावर काढलेल्या या दीर्घ १२ वर्षांनंतरही माझे विचार
तसेच आहेत. तरवारीने जे निर्बंध घोषिले गेले आणि प्रजापीडनाचे बिकट स्वरूप टाकून
टाकण्याचे अवगुंठन म्हणून ज्या राज्यघटना उपयोजिल्या गेल्या त्यांना निष्ठावंत
राहणे आणि त्यांच्याविषयी भक्ती बाळगणे आम्हाला अशक्य झाले हे खरे आहे. पण तितकेच
हेही खरे आहे की, तेव्हाही धर्मनियमांचे पालन करणे, राज्यघटनेचा
पुरस्कार करणे, हे आमचे कर्तव्य आहे असेच आम्हाला मनापासून वाटे आणि अद्यापिही वाटते. पण ते
नियम म्हणजे स्वतंत्र जनतेच्या न्यायान्यायाच्या कल्पनेच्या सत्य स्वरूपाचे
निदर्शक पाहिजेत आणि ती घटना म्हणजे मनुष्यजातीच्या कल्याणासाठी आणि दैवी वैभवाच्या
प्राप्तीसाठी स्वतंत्र स्त्री-पुरूषांनी केलेले प्रयत्न जीत एकत्र आले आहेत, एकतान बनले आहेत
आणि एकजीव झाले आहेत अशी पाहिजे.
हिंदुस्थानातील वरिष्ठ कार्यकारी मंत्रिमंडळाच्या सभासदासारख्या प्रतिष्ठित
अधिकार्यांनी मला आणि इतरांना पुढील प्रश्न पुष्कळदा टाकला होता - ‘‘तुम्ही
पूर्वीच्या हिंदी राज्याच्या विरुद्ध उठावणी केली असती तर तुमची स्थिती काय असती? ते विद्रोह्यांना
हत्तीच्या पायाखाली तुडवीत!’’ त्याला माझ्याकडून उत्तरही मिळाले होते.
हिंदुस्थानातच काय, जगाच्या कोणत्याही देशात-प्रत्यक्ष
इंग्लंडमध्ये सुद्धा - विद्रोह्यांना कधी कधी असली भयंकर शिक्षा भोगण्याचे दैवी
येई. पण मग इंग्रज लोकांनी युद्धाच्या वेळी जर्मन लोक आमच्या बंद्यांना वाईट
रीतीने वागवतात आणि चांगले जेवण देत नाहीत अशा कोल्हेकुईने जगाच्या कानठळ्या का
बसवाव्या? जर्मनांनीही त्या वेळी त्यांना ‘‘चांगले जेवण? एके काळी तर कारागृहातील
बंद्यांची जिवंतपणी कातडी सोलुन मोलॉक, थॉर किंवा असल्याच युरोपातील युद्ध देवतांना
त्यांचा बळी देत असत’’ अशी आठवण दिली असती म्हणजे? खरी गोष्ट अशी आहे की, जगाच्या
संस्कृतीत मनुष्यप्राण्याने जी सुधारणा घडवली आहे ती सर्व राष्ट्रांतील
मनुष्याच्या प्रयत्नांचे संकलित फळ आहे आणि म्हणून ती सर्व मनुष्यजातीचा वारसा आहे
आणि तिचा लाभ सर्वांना मिळाला पाहिजे. त्या रानटी युगाच्या तुलनेनेच म्हणावयाचे तर
माझी चौकशीही पुष्कळ चांगली झाली व शिक्षाही अधिक न्याय्य झाली हे खरे आहे; आणि मनुष्यभक्षक
जाती आपल्या बंद्यांना जी शिक्षा देत किंवा चौकशीचे जे नाटक करीत त्यापेक्षा अधिक
चांगली पद्धती या सरकारची आहे या प्रशस्तीपत्राने सरकारचे समाधान होत असेल तर
त्याला माझी ना नाही. पण त्यावेळीच हेही विसरता कामा नये की, पूर्वीच्या काळात
राजे विद्रोह्यांना जसे जिवंत सोलीत त्याचप्रमाणे विद्रोहीही त्यांची भाग्यतारा
जोरात आल्यावर या राज्यकर्त्यांना जिवंत जाळीत! आणि जर इंग्रजी जनतेने मला किंवा
इतर विद्रोह्यांना अधिक न्यायाने, म्हणजे कमी रानटीपणाने, वागवले असेल तर
त्यांनीही आश्वस्त असावे की परिस्थितीची उलटापालट झाली तर हिंदी क्रांतिकारकही
त्यांना अशाच दयेने वागवतील!
या अर्जापासून आमच्या सुटकेच्यासंबंधात विशेष काही होईल अशी आशा करू नकोस.
आम्ही आमची आशा कधीच बळावू दिली नाही आणि त्यामुळे सुटका न झाल्यास आम्हाला
त्याविषयी विशेष निराशाही वाटणार नाही. काहीही निर्णय झाला तरी तो स्वीकारावयाला
आम्ही सिद्ध आहो. तू आपल्याकडून शक्य तितका प्रयत्न केला आहेस आणि मुख्यतः तुझ्या
संतत उद्योगाचेच हे फळ आहे की राजकीय बंद्यांच्या मुक्ततेच्या प्रश्नाला इतके
तीव्र स्वरूप आले नि आम्हांला दोघांना वगळले तरी उर्वरित शेकडो राजकीय बंद्यांना
आपले स्वातंत्र्य परत मिळाले.
तुझी प्रकृती उत्तम असेल अशी आशा करून आणि स्नेह्यांना आणि नातलगांना नमस्कार
लिहून हे पत्र पुरे करतो.
प्रिय बाळ, तुझाच
प्रिय तात्या
या पत्रातील मजकूर अन्य वृत्तपत्रांबरोबर दै. मराठा मध्ये २५ जानेवारी १९२० ला
छापून आल्याची पोलीस नोंद आहे. या बातमीच्या आधारे विधिमंडळात प्रश्न विचारण्यात
आले.
आरोप क्र. २ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या सुटकेनंतर काहीच देशकार्य
केले नाही, त्यांनी
ब्रिटिशांना सहकार्य केले, नेताजी बोस यांना विरोध केला.
वस्तुस्थिती – आपल्या रत्नागिरीच्या १४ वर्षांच्या प्रदीर्घ स्थानबद्धतेच्या
काळात सावरकरांना राजकीय कामाची बंदी होती. त्यामुळे त्यांनी हिंदु समाजातील
अनिष्ट जातीप्रथांविरुद्ध आणि अनिष्ठ रुढी, अंधविश्वासाविरुद्ध लढा पुकारला. त्यांचे
रत्नागिरीतील १४ वर्षांचे अफाट कार्य बघून कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी रत्नागिरी
येथे केलेल्या भाषणात कौतुक करून ``माझे उरलेले आयुष्य देवाने सावरकरांना द्यावे'', असे जाहीर उद्गार
काढले होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ``केवळ अस्पृश्यताच नव्हे तर जाती संस्थेचेच
निर्मूलन झाले पाहिजे अशा विचारांशी सहमत असलेल्या मोजक्या व्यक्तिंमध्ये आपण आहात
याबद्दल मला आनंद आहे.'' सावरकरांच्या अस्पृश्यता निर्मूलनाच्या प्रचंड
कार्याचे संपूर्ण विवरण आज सगळ्यांना उपलब्ध असल्यामु्ळे या विषयावर अधिक
लिहिण्याची आवश्यकता नाही. परंतु एवढेच सांगणे पुरे की, सावरकर हे श्री.
टकले यांच्या आरोपानुसार ब्रिटिशांना सहकार्य करणारे असते तर भारतातील असंख्य
ज्येष्ठ पुढारी, ज्यात महात्मा गांधींचाही समावेश आहे, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भेटण्यासाठी
रत्नागिरीसारख्या दुर्गम भागात गेले नसते.
पृथ्वीसिंह आझाद यांना अंदमानातून
भारतात परत आणल्यानंतर ते ब्रिटिशांच्या कैदेतून निसटले होते.
त्यावेळी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे
लहान बंधू नारायणराव सावरकर यांनीच त्यांना आसरा दिला होता. (क्रांति के पथिक –
पृष्ठ १५३) त्यानंतर भगतसिंग यांना फाशीची सजा सुनावल्याचा सूड म्हणून जेव्हा
पृथ्वीसिंह आझाद आणि सुप्रसिद्ध महिला क्रांतिकारी दुर्गाभाभी व्होरा यांनी जेव्हा
१९३० साली लॅमिंग्टन पोलिस ठाण्यावर गोळीबार केला, तेव्हा त्यांच्याबरोबर
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विश्वासू सहकारी आणि क्रांतिकारक गणेश रघुनाथ
वैशंपायन होते. (क्रांति के पथिक - पृष्ठ १९०)
सावरकर सुटल्यानंतर त्यांच्यावर सतत पोलिसांची दृष्टी असल्याने उघड
क्रांतीकार्य करणे त्यांना शक्य नव्हते हे एखादा सामान्य बुद्धीचा माणूसही सांगू
शकतो. त्यामुळेच श्री. टकले जेव्हा स्वत:च लिहितात की क्रांतिकारक विनायक चव्हाण
हे सावरकरांचे अनुयायी होते. तेव्हा सावरकरांवर ब्रिटीश सरकारशी हातमिळवणी
केल्याचा आरोप हा जाणून बुजून सावरकरांचे चारित्र्य हनन करण्यासाठीच केला आहे हे
सिद्ध होते.
१९३७ नंतर जेव्हा स्वातंत्र्यवीर सावरकरांची बंधने काढून घेण्यात आली तेव्हा
ते हिंदुमहासभेचे अध्यक्ष झाले. मुस्लिम लीगच्या अवास्तव मागण्या आणि काँग्रेस
लीगचा करत असलेला अनुनय या पार्श्वभूमीवर भारतापुढे फाळणीचा धोका निर्माण झाला
होता. त्यामुळे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी फाळणी टाळण्यासाठी अविरत कष्ट घेऊन
लोकजागृती केली. सावरकरांची संपूर्ण अध्यक्षीय भाषणे ‘हिंदुराष्ट्रदर्शन’ या
पुस्तकात उपलब्ध आहेत.
भारतीय सैन्यात हिंदूंनी भरती व्हावे म्हणून त्यांनी प्रचार केला. त्यावेळी
भारतीय सैन्यात हिंदूंचे प्रमाण ३५-४० % होते, ते हिंदूमहासभेच्या प्रचार अभियानामुळे ६५% वर
गेले. फाळणीनंतर बहुसंख्य मुस्लीम सैन्य पाकिस्तानकडे जाईल आणि जर पाकिस्तानने
आक्रमण केले तर अनावस्था ओढवेल ही दूरदृष्टी त्या मागे होती आणि झालेही तसेच. सर्व
मुस्लीम-बहुल पलटणी पाकिस्तानात सामील झाल्या आणि १९४८ मध्ये पाकिस्तानने भारतावर
पहिले आक्रमण केले. पण सावरकरांच्या दूरदृष्टीमुळे भारत सैन्यबळात कमी पडला नाही.
सैन्य भरतीमागील दुसरा हेतू
स्वातंत्र्यवीर सावरकर काही जपानी बुद्ध भिक्षूंच्या द्वारे जपानमध्ये असलेले
थोर भारतीय क्रांतिकारक आणि आझाद हिंद सेनेचे संस्थापक रास बिहारी बोस यांच्या
संपर्कात होते. जग पुन्हा महायुद्धाच्या उंबरठ्यावर उभे असल्याने महायुद्धात योग्य
वेळी सैनिकी उठाव घडविण्याची त्यांची योजना होती. असे प्रयत्न पहिल्या महायुद्धात
पण झाले होते आणि त्यात सावरकरांनी स्थापन केलेल्या अभिनव भारत या संघटनेच्या
सदस्यांचा सहभाग होता. अशा कटांचे स्पष्ट पुरावे कधीच नसतात, पण परिस्थितीजन्य
पुराव्यांनी ते सिद्ध करता येते.
२१ मार्च १९४२ या दिवशी रासबिहारी बोस रेडिओवरून सावरकरांना उद्देशून बोलताना
म्हणाले, “तुमच्यासारख्या ज्येष्ठ सहकारी योद्ध्याला प्रणाम करणे, हे माझे कर्तव्य
असल्याचे मी समजतो. भारतीय राजनीती ही कधीही परकीय देशाच्या नीतीवर अवलंबून नसावी
आणि शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असावा, या धोरणाचा पुरस्कार करून आपण आपली थोरवी
पुन्हा सिद्ध केली आहे.''
२५ जून १९४४ या दिवशी नेताजी सुभाषचंद्र बोस आझाद हिंद रेडिओवरून बोलताना
म्हणाले, ``लहरी आणि भ्रामक राजकीय विचार आणि दूरदृष्टीच्या आभावामुळे
आज बहुतांश काँग्रेस नेते भारतीय सेनेच्या सैनिकांना भाडोत्री म्हणून हिणवत असताना
वीर सावरकर निर्भयतेने भारतीय युवकांना सैन्यात भरती होण्यासाठी प्रोत्साहित करत
आहेत, ही समाधानाची बाब आहे. याच सैनिकांमधून आपल्या भारतीय राष्ट्रीय सेनेला
प्रशिक्षित सैनिक मिळत आहेत.''
त्याचप्रमाणे या काळात स्वातंत्र्यवीर सावरकर जपानमधील क्रांतिकारक आणि आझाद हिंद
सेनेचे संस्थापक रासबिहारी बोस यांच्या संपर्कात असल्याचे निर्विवाद पुरावे उपलब्ध
झाले आहेत. त्यानुसार, सावरकरांनी सुरु केलेल्या सैन्य भऱतीला
रासबिहारी बोस यांचे समर्थन असल्याचे सिद्ध होते. रासबिहारी बोस यांनी मार्च आणि
एप्रिल १९३९ मध्ये दाई आजिया शुगी या जपानी मासिकात सावरकरांचे चरित्र लिहिले. या
चरित्राचे शीर्षक होते, `सावरकर – नव्या भारताचा उगवता नेता – कर्तृत्व
आणि व्यक्तिमत्व.' या लेखात सावरकरांच्या सैनिकीकरणाच्या धोरणाची
आणि हिंदुत्ववादाची ओळख जपानी जनतेला करून देताना त्यांनी लेखाच्या शेवटी काढलेला
निष्कर्ष महत्वाचा आहे. लेखाचा शेवट करताना ते म्हणतात, “तुम्ही
सावरकरांच्या विचारांशी सहमत झालात तरच तुम्ही राजकीय दृष्टीने सामर्थ्यशाली बनाल.
सावरकरांचे हे भारतीय स्वातंत्र्यचळवळीतील स्थान अढळ आहे.''
आरोप क्र. ३ – स्वातंत्र्यवीर सावरकरांनी द्वि राष्ट्रवादाचा पुरस्कार केला.
वस्तुस्थिती – याबद्दल पुरावा म्हणून स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे १५ ऑगस्ट
१९४३ रोजी नागपूर येथे केलेले खालील कथित वक्तव्य श्री. टकले सादर करतात. “I have no
quarrel with Mr. Jinnah's two-nation theory. We, Hindus, are a nation by
ourselves and it is a historical fact that Hindus and Muslims are two
nations.'' परंतु काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेले हे वक्तव्य
वस्तुस्थितीचा विपर्यास करणारे असल्याचे स्वतः स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्पष्ट
केले होते.
दिनांक १९ ऑगस्ट १९४३ या दिवशी दै. काळ मध्ये प्रसिद्ध झालेल्या
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, पत्रकार परिषदेत
त्यांनी मांडलेली विस्तृत मते विपर्यास्त स्वरुपात मांडून स्वातंत्र्यवीर सावरकर
हे द्वि राष्ट्रवादाचे प्रणेते हे खोटे वृत्त प्रकाशित झाले आहे. मूळातच जगभरातील
मुसलमान स्वतःला खलिफाच्या नेतृत्वाखालील धार्मिक राष्ट्र मानत आले आहेत आणि या
दृष्टीने मुसलमान स्वतःला वेगळे राष्ट्र मानतात. परंतु वस्तुस्थितीनुसार, राजकीय
लोकशाहीच्या दृष्टीने हिंदू हेच राष्ट्र आहे, कारण अनादि कालापासून तेच इथे बहुसंख्येने आहेत
आणि मु्स्लिम एक अल्पसंख्यांक व आक्रमक जमात आहे. मुस्लिमांच्या या धोरणामुळे
भारतापुढे फाळणीचा धोका निर्माण झाल्याने सावरकरांनी हिंदुसभेच्या कार्यकर्त्यांना
फाळणीविरुद्ध लढण्याचे आदेश दिले.
द्वीराष्ट्रवादाचा सिद्धांत हा मूळातच १९ व्या शतकात सर सय्यद अहमद यांनी मांडला
होता त्यानंतर उर्दू कवी इक्बाल याने त्याचा पुरस्कार केला आणि शेवटी जिना यांच्या
नेतृत्वाखाली मुस्लिम लीगने ही मागणी उचलून धरली. यात सावरकरांचा काहीही संबंध
नाही. हे त्यांच्या वेळोवेळी केलेल्या भाषणांमधून स्पष्ट होते. पुन्हा हे अधोरेखित
करणे आवश्यक आहे की, उद्धृत केलेले वक्तृत्व विपर्यास करणारे
असल्याचे सावरकरांनी लगेचच स्पष्ट केले होते.
आरोप क्र. ४ – स्वातंत्र्यवीर सावरकर हे गांधीहत्येत सहभागी होते.
वस्तुस्थिती – स्वातंत्र्यवीर सावरकर यांची गांधीहत्येच्या आरोपातून निर्विवाद
सुटका झाली होती. सावरकर या कटात सहभागी
होते, असा कणमात्र पुरावा कोर्टापुढे येऊ शकला नाही. असे असतानाही आता श्री. टकले
यांनी कपूर कमिशनने स्वातंत्र्यवीर सावरकर या कटाचे सूत्रधार असल्याचा निष्कर्ष
काढल्याचे धादांत खोटे विधान केले आहे.
कपूर कमिशनच्या पूर्ण अहवालात गोडसे आणि इतर आरोपींचा सावरकरवादी असा हेतूतः
उल्लेख सतत करण्यात आला आहे. गोडसे आणि इतर हे हिंदुमहासभेचे अनुयायी होते आणि
सावरकर अध्यक्ष असल्यामुळे त्यांच्या संपर्कात होते. गांधीहत्येच्या सुमारे दोन
वर्षे आधी अध्यक्षपदावरून निवृत्त झाल्यानंतर त्यांचा गोडसे यांच्याशी संपर्क नव्हता.
१५ ऑगस्ट १९४७ या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी आपल्या घरावर राष्ट्रध्वज
फडकाविल्याबद्दल आणि केंद्र शासनाला मतभेद बाजूला ठेऊन सहकार्य करण्याच्या
धोरणाबद्दल नथुराम गोडसे यांनी सावरकरांवर
दै. अग्रणी मध्ये लिहिलेल्या अग्रलेखात तीव्र टिका केली होती. त्यामुळे नथुराम
गोडसे हे सावरकरांचे अनुयायी नसून स्वत:चे विचार असणारी व्यक्ती असल्याचे स्पष्ट
होत असताना केवळ द्वेषामुळे या अहवालात आरोपींचा उल्लेख सतत सावरकरवादी म्हणून
करण्यात आला आहे.
पुढे जाउन कपूर कमिशनने २५ व्या प्रकरणात मुंबईमधील तपासाचा उहापोह करताना
नगरवाला यांना मिळालेला उपलब्ध पुरावा हा हत्येच्या कटाकडे निर्देश करत असल्याचे
म्हणत नगरवाला यांनी त्या दिशेने तपास करायला हवा होता, अशा अर्थाची
विधाने केली आहेत. परंतु कुठलाही पुरावा नसताना मध्येच त्यांनी All these facts
taken together were distructive of any theory other than the conspiracy to
murder by Savarkar and his group असा उल्लेख बेजबाबदारपणे केला आहे. परंतु
प्रकरण २५ व्या निष्कर्षात याबद्दल काहीच नाही. तसेच अहवालाच्या अंतिम
निष्कर्षातदेखील असा एकही शब्द नाही. तेव्हा द्वेषबुद्धीने अहवालात मध्येच कुठेतरी
घुसडलेले, शेंडाबुडका नसलेले वाक्य हा कपूर कमिशनचा निष्कर्ष आहे, हे संपूर्ण खोटे
आहे.
याही पुढे जावून श्री. टकले यांनी खोटारडेपणाचा कळस करत कपूर कमिशनपुढे
सावरकरांचे सचिव गजानन दामले आणि अंगरक्षक आप्पा कासार यांनी सावरकर हे
गांधीहत्येत सहभागी असल्याची आम्हाला माहिती होती, अशी साक्ष दिल्याचे
निखालस खोटे विधान केले आहे. परंतु या दोघांनी कपूर कमिशनपुढे कधीही साक्ष दिली
नव्हती. गांधीहत्येच्या खटल्यातही या दोघांना साक्षीदार करण्यात आले नव्हते. कपूर
कमिशनपुढे तपासलेल्या १०१ साक्षीदारांच्या यादीत त्यांचे नाव नाही.
‘मेन हु किल्ड
गांधी’ या पुस्तकाचे लेखक मनोहर माळगावकर यांनी माफीचा साक्षीदार बडगे याची मुलाखत
घेतली तेव्हा “सावरकरांना आम्ही भेटलोच नव्हतो आणि मला त्यांच्या विरुद्ध खोटी
साक्ष द्यायला भाग पाडले” अशी कबुली बडगे यांनी दिली होती.
आरोप क्र. ५ - स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा तिरंगा राष्ट्रध्वजाला विरोध होता.
वस्तुस्थिती – चरखा असलेला तिरंगा राष्ट्रध्वज करण्यास स्वातंत्र्यवीर सावरकर
यांचा तीव्र विरोध होता, कारण तो एका पक्षाचा ध्वज होता. परंतु स्वतंत्र
भारताच्या चक्रांकित ध्वजाला त्यांचा पाठिंबा होता आणि १५ ऑगस्ट १९४७ ला आपल्या
घरावर त्यांनी राष्ट्रध्वज फडकवला होता.
त्यांच्या कल्पनेतून निर्माण झालेला आणि मादाम कामा यांनी स्टुटगार्ड
आंतरराष्ट्रीय परिषदेत २१ ऑगस्ट १९०७ या दिवशी फडकाविलेला भारताचा राष्ट्रध्वजही
तिरंगा होता.
- रणजित सावरकर,
कार्याध्यक्ष,
स्वा. सावरकर राष्ट्रीय स्मारक,
मुंबई – ४०० ०२८
·
सावरकरांचे विचार मान्य केलेत तरच तुम्ही राजकीय सामर्थ्य
मिळवू शकाल. सावरकरांचे स्वतंत्रता चळवळीतील स्थान महत्वपूर्ण आहे. – रास बिहारी बोस (एप्रिल
१९३९)
· सावरकर हे शौर्य, धैर्य आणि
राष्ट्रीयत्वाचे मूर्तिमंत प्रतिक आहेत – सी राजगोपालाचारी, भारताचे पहिले गव्हर्नर
जनरल
· आपल्या देशाने सावरकरांचे
ऐकले असते आणि त्यांचे सैनिकीकरणाचे धोरण स्विकारून दक्षतेने युद्धसज्जता ठेवली
असती तर आज हे संकट मुळात उद्भवलेच नसते - फिल्ड मार्शल करिअप्पा (चीनयुद्धातील पराभवा
नंतर).
· कपूर कमिशनचा अहवाल सादर
झाल्यानंतर भारताच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी टपाल तिकीट प्रकाशित केले व
नंतर स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाला रु. १०,०००/- वैयक्तिक देणगी
दिली.
· २८ मे १९७९ ला उपपंतप्रधान
बाबू जगजीवन राम यांनी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर
सावरकर राष्ट्रीय स्मारकाचा शिलान्यास केला.
·
२८ मे १९८९ ला उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते
स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री शरद
पवार यांच्या उपस्थितीत झाले.
स्वातंत्र्यवीर
विनायक दामोदर सावरकर यांच्या सारख्या महान क्रांतीकारकाला, स्वातंत्र्यप्राप्ती
नंतर, गांधीवधाच्या खटल्यात राजकीय स्वार्थासाठी गोवले गेले. कुठल्याही पुरावा
नसल्यामुळे न्यायालयाने त्यांची निर्दोष मुक्तता केली. परंतु त्या नंतरही कपूर
कमिशनचा आधार घेत सावरकरांवर चिखलफेक होतच राहिली.
कपूर कमिशनचा अहवाल सादर झाल्यानंतर भारताच्या
पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी टपाल तिकीट प्रकाशित केले व नंतर स्वातंत्र्यवीर
सावरकर राष्ट्रीय स्मारकाला रु. १०,०००/- देणगी वैयक्तिक खात्यातून दिली. २८ मे १९७९ ला उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम
यांनी मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय
स्मारकाचा शिलान्यास केला. २८ मे १९८९ ला उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या
हस्ते स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री शरद पवार यांच्या उपस्थितीत झाले.
परंतु असे असतानाही,
नुकत्याच “ द वीक “ च्या २४ जानेवारीच्या अंकात प्रसिध्द झालेल्या लेखात
संशोधनाच्या नावाखाली सावरकरांवर तद्दन निराधार आरोप करण्यात आले आहेत. या लेखात
सर्व आरोपांचे ऐतिहासिक कागदपत्रांच्या आधारे पूर्णत: खंडन केले आहे.
- रणजित सावरकर.
No comments:
Post a Comment