चंद्रगुप्त (दुसरा)
– सर्जिकल स्ट्राईक चा जनक
शकांवर आपल्या सैन्यबलाने
वर्चस्व स्थापन करणारा पराक्रमी सम्राट समुद्रगुप्त इ.स. ३७५ मध्ये मरण पावला. त्याने आपल्यामागे त्याचा धाकटा पण तेजस्वी नि तरुण पुत्र जो चंद्रगुप्त (दुसरा) त्यासच सम्राटपद द्यावे असे सांगितले होते. परंतु ही त्याची आज्ञा न मानता त्याचा ज्येष्ठ पुत्र जो रामगुप्त तोच आपल्या ज्येष्ठत्वाचा अधिकार सांगून सिंहासनावर बसला.
सम्राट समुद्रगुप्त मृत्यू पावल्यामुळे आणि त्याच्यामागे रामगुप्तासारखा दुर्बल पुरुष सम्राट झाल्यामुळे शकराजे निर्भय जाहले आणि त्यांच्यापैकी एका उर्मट नि अधम म्लेंच्छराजाने सम्राट रामगुप्ताचा उपमर्द करण्यासाठी त्यास ‘आज्ञा’ केली की ‘तू तुझी सुंदर नि तरुण पत्नी गृहदेवी हिला माझ्याकडे धाडून दे. नाही तर युद्धास सिद्ध हो!’ हा उपमर्दकारक नीचपणाचा निरोप ऐकताच मगधराज्यातील सारे राजकीय वातावरण क्षुब्ध होऊन उठले. परंतु सम्राट म्हणविणार्या रामगुप्ताच्या नेभळेपणाची नि निलर्ज्जपणाची इतकी परमावधी झाली होती की, त्याने ‘केवळ युद्ध टळावे’ म्हणून आपल्या राणीस, गृहदेवीस त्या शकक्षत्रपाकडे धाडण्याची सिद्धता केली. हे पाहताच त्याचा वर उल्लेखिलेला धाकटा भाऊ जो चंद्रगुप्त तो संतापाने लाल झाला.
रामगुप्ताच्या आज्ञेला भीक न घालता त्याने गृहदेवीला आपल्या संरक्षणाखाली घेतले. नंतर कूटनीतीचा अवलंब करून चंद्रगुप्ताने त्या शकराजाला परत निरोप धाडला की आपल्या आज्ञेप्रमाणे राणी गृहदेवीला आपल्याकडे धाडण्यात येत आहे. पण स्त्रीसुलभ लज्जेमुळे ती पडदा सोडलेल्या मेण्यातून येऊ इच्छिते. तिच्यासमवेत तिच्या दासींचा परिवारही तशाच मेण्यांतून येत आहे. हा संदेश ऐकताच तो शकराजा अगदी हुरळून गेला आणि त्या योजनेप्रमाणे राणीस धाडून द्यावे, असे त्याने कळविले. इकडे चंद्रगुप्त स्वतः स्त्रीवेष धारण करून राणीच्या मेण्यात बसला. समवेत येणार्या दासींच्या अनेक मेण्यांतूनही त्याचे निवडक सैनिक वीर स्त्रीवेष घेऊन बसले. तो झाकलेल्या मेण्यांचा मेळावा त्या शकराजाच्या राजधानीशी येताच आनंदाने उल्लू झालेला तो शकराजा राणीच्या स्वागतार्थ स्वतः तिच्या मेण्यापाशी आला. इतक्यात दासी वेषातील चंद्रगुप्ताने त्याच्यावर झडप घालून आपल्या तरवारीने त्या असावध राजाचा तत्काळ शिरच्छेद केला. इतर मेण्यांतूनही चंद्रगुप्ताच्या त्या सशस्त्र सैनिकांनी शस्त्रे उपसून खाली उड्या घेतल्या. शकराजाच्या शिरच्छेदाची भयंकर बातमी आजूबाजूला पसरते न पसरते तोच चंद्रगुप्तासह ते सारे सशस्त्र पथक शत्रूच्या आटोक्यातून पाहता पाहता भरधाव निसटून गेले.

हे अद्भुत साहसाचे कृत्य करून आणि आपल्या राष्ट्राचा उपमर्द करणार्या शकराजास स्वहस्ते देहान्त प्रायश्चित देऊन राजपुत्र चंद्रगुप्त पाटलीपुत्रास परत आला आहे, ही वार्ता पसरताच सारी राजधानी आणि राष्ट्र चंद्रगुप्ताच्या जयजयकाराने दुमदुमून गेले. दिवंगत सम्राट समुद्रगुप्ताच्या आज्ञेचे उल्लंघन करून सिंहासनावर चढलेल्या त्या भेकड रामगुप्ताला खाली ओढून चंद्रगुप्तालाच सम्राटपद दिले पाहिजे, म्हणून मोठी उठावणी झाली. त्या प्रक्षोभात रामगुप्त ठार मारला गेला. चंद्रगुप्त साम्राज्यपदावर आरूढ झाला. शत्रूकडून होणार्या विटंबनेपासून जिला त्याने आपल्या अद्भुत पराक्रमाने मुक्त केले होते त्या राणी गृहदेवीशीच चंद्रगुप्ताने विवाह केला. नंतर आपली बलाढ्य सेना सुसज्ज करून सम्राट चंद्रगुप्ताने शकक्षत्रपांवर स्वारी करून त्यांची ठिकठिकाणी धूळधाण उडवली.
शकांचा असा पूर्ण मोड होताच त्यांच्या हाती त्यावेळी असलेल्या सिंध, कच्छ, सौराष्ट्र, गुजराथ, माळवा इत्यादी प्रांतांना स्वतंत्र करून सम्राट चंद्रगुप्ताने आपल्या भारतीय साम्राज्यात समाविष्ट केले. शकराजांचा असा समूळ उच्छेद केल्यानंतर सम्राट चंद्रगुप्ताने ‘विक्रमादित्य’ ही पदवी धारण केली आणि पूर्वीपासून तिकडे चालत आलेल्या मालव संवतालाच शकांचा समूळ उच्छेद करणार्या ह्या महान विजयाच्या स्मरणार्थ आपले नाव देऊन ‘विक्रम संवत्’ चालू केला. त्याने उज्जयिनीलाच आपल्या भारतीय साम्राज्याची राजधानी केली आणि तेथे तो सिंहासनारूढ होऊन वास्तव्य करू लागला.
(स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या सहा सोनेरी पणे या ग्रंथातून)
No comments:
Post a Comment